Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: जुंपली' येथे लढा‌ई; मरणाची काही खैर नाही!

Saturday, July 22, 2006

जुंपली' येथे लढा‌ई; मरणाची काही खैर नाही!

हे कुण्या चित्रपटातील दृश‍य नाही. "मदर इंडिया'तील तर नाहीच नाही. बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक‍यात ही लढा‌ई सुरू आहे. ....
.... ही कहाणी आहे, बैल नाही म्हणून पोटच्या गोळ्यांना नांगराला जुंपणाऱ्या दुर्दैवी बापाची अन‌ हे दृश‍य नजरेस पडल्यावर ढसाढसा रडणाऱ्या एका "बाप" माणसाची! या वास्तवाला सामोरा जाणारा शेतकरी नायक आहे भीमराव गोविंद मुळे !.. महानायक मात्र वेगळाच !

..हंगाम आला. बैलजोडी नाही. जवळ पुंजीही नाही. काय करायचे? भीमराव मुळेंना ही चिंता सतावत होती. गात्रे थकलेली. उधार-उसणवारीची सोय नाही. मुलीचे लग्न याच वर्षी झाले. ६१ हजारांच्या हुंड्यासह खर्चाची रक्‍कम एक लाखावर गेली. १५ हजार कमी पडले म्हणून काळजावर दगड ठेवत बैलजोडीही बाजारात न्यावी लागली. बैल विकले. मुलगी सासरी गेली.


भीमरावांना वाटले जबाबदारीतून सुटलो; पण हंगाम आला, तो समस्यांचा डोंगर घे‌ऊनच. पीककर्जाचे प्रकरण बॅंकेत धूळखात पडलेले. गेल्या वर्षी विकलेल्या बियाण्यांची रक्कम अजून मिळालेली नाही. भरीस भर म्हणजे, निवृत्तिवेतनावर आधीच कर्ज काढलेले. १,४०० रुपये हप्ता दरमहिन्याला कापणे सुरू होते. गावात "पत'नसल्याने सावकारही दारात उभे राहू दे‌ईना. शेती केली नाही, तर हप्ता भरायचा कोठून?...साऱ्याच समस्या. मात्र, आयुष्यभर खपलेला गडी खचणार कसा? समाजव्यवस्था आणि लोकनिंदा बाजूला सारत मुलांनी खंबीर साथ दिली. शेतात चर काढण्यासाठी भीमरावांनी स्वतः नांगर हाती घेतला. ह्रदयाला चरे पडत असतानाही दोन्ही मुलांना नांगराला "जुंपले".


यातील निवृत्तिवेतनाचा संदर्भ स्पष्ट केला, तर व्यवस्थेतील विदारकता अधिक प्रकर्षाने पुढे येते. भीमराव निवृत्त सैनिक आहेत. १९७१-७२ मध्ये ते आग्रा येथे होते. देशासाठी लढणाऱ्या एका वृद्ध सैनिकाला शत्रूने नव्हे, तर परिस्थितीनेच दग ा दिला. गारद मात्र केले नाही. "बॉण्ड' संपला, आयुष्यासोबत रोजची लढा‌ई सुरू झाली... रांगड्या नायकाला मुलांची समर्थ साथ लाभली म्हणून ठीक; अन्यथा शेतीसोबत त्यांचे आयुष्यही करपून गेले असते...

...अन महानायक आला!तालुक‍यातील गोद्री या गावातून कलमा आणायला ते निघाले. रस्त्यातच भीमरावांच्या शेतातील दृश‍य त्यांच्या नजरेला पडले. त्यांनी लगेच गाडी थांबविली. थोडावेळ दूरूनच निरीक्षण केले. डॉक‍टर आणि त्यांची दोन मुले आलिशान कारमध्ये होती, तर भीमराव आणि त्यांची दोन मुले शेतात. रणरणत्या उन्हात. विंचूदंशावर संशोधन करणाऱ्या डॉक‍टर बावस्करांना शेतातील दृश‍याने तर अंतर्बाह्य दंश केला. त्यांचे काळीज गहिवरले. व्यवस्थेवर आघात करणारे हे दृश‍य त्यांनी आपल्या मोबा‌ईल कॅमेऱ्यात टिपले आणि दोन्ही मुलांसह थेट शेत गाठले. चोवीसशे रुपयांच्या निवृत्तिवेतनातून पाचसातशे रुपये हाती पडणारे भीमराव संसाराचा गाडा कसा ओढत असतील? काय करायला हवे? डॉक‍टरांना काळजीने वेढले. घा‌ई असल्याने ते घरी परतले. भीमरावांच्या परिस्थितीने त्यांची झोप उडाली. ते ढसाढसा रडत होते. सकाळी उठून त्यांनी सारी तळमळ आपले मित्र आणि बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा‌अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दूरध्वनीव रून कळविली. लागलीच तयारी केली आणि ते दोघेही निघाले पुन्हा भीमरावांच्या शेतात. बैलजोडी घेण्यासाठी डॉक‍टर बावस्करांनी १० हजारांचा चेक भीमरावांच्या हाती दिला, तेव्हा त्यांची तगमग दूर झाली. एक दडपण दूर झाले होते.


नात्यापात्यातील नसतानाही एका बळीराजाची वेदना डॉक्‍टरांनी वेचली. या गोष्टीची कुठेही वाच्यता हो‌ऊ नये, याची काळजीही त्यांनी घेतली. त्यांचे मित्र हर्षवर्धन सपकाळ हे तर राजकीय क्षेत्रातील. डॉ. बावस्करांसोबतचे चेक देतानाचे छायाचित्र ते कुठेही प्रकाशित करू शकले असते. मात्र वेदनेवरील माणुसकीची फुंकर त्यांनी हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवली. जुंपलेल्या जोडीचा "भाव' करण्यापेक्षा त्याचे मोल त्यांनी जाणले. घटनेला पा‌ऊण महिना झाल्यावर ही कहाणी प्रकाशित होतेय, ती या दोघांच्या नाराजीतूनच. समाजातील "आयडॉल' लपवून कशाला ठेवायचे? एवढाच काय तो यामागचा विचार.


भारत महासत्ता होणार, असा डीडींम पिटणारे आणि त्या नादात आत्ममग्न असलेले स्वयंघोषित पुढारी या घटनेपासून काही बोध घेणार की नाही? डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्याबद्दल अधिक सांगायचे तर, "बॅरिस्टरचं कार्टं' हे त्यांचे चरित्र यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. मुंब‌ईच्या मॅजेस्टिक प्रकाशनाने ते प्रसिद्ध केलेय. त्याला पुरस्कारही मिळालेत. डॉक्‍टरांनी केलेला माणुसकीचा पुरस्कार आपल्या साऱ्यांसाठीच महत्त्वाचा. वय झाल्यावरही उमेद न सोडणारे भीमराव या कहाणीचे नायक आहेत, तर दान दिल्यावरही गाजावाजा न करता निमूट निघून जाणारे डॉ. बावस्कर महानायक. आणि हो, भीमराव गोविंद मुळे. वय ६०. राहणार गोद्री. यांनी डॉ. बावस्करांची पा‌ई पा‌ई फेडण्याची हमी स्वतःहून दिली आहे. भीमराव म्हणतात, ""माझी उमर अजून बाकी आहे आणि माझ्या पोरांची जिद्ददेखील !''
*******

पोटच्या मुलांना नांगराला जुंपावे लागणाऱ्या भीमराव मुळे यांची कहाणी वाचून तुमच्या मनात काय प्रतिक्रिया उमटल्या त्यांची येथे नोंद करा.


श्री. भिमराव मुळे ह्यांना मदत करण्यासाठी बरेचजण पुढे येत आहेत. मी त्यांच्या पत्ता व इतर सविस्तर माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मिळाल्या मिळाल्या मी ती प्रसिद्ध करेनच. तो पर्यंत माझा संपर्क साठीचा पत्ता.
दिलीप कुलकर्णी
पि.ओ. बॉक्स ५२८९१,
दुबई.
संयुक्त अरब संस्थान.
ई-मेल: dilipkulkarniin@rediffmail.com
mobAIl:00971 50 3834547.

0 Comments:

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>