Javascript is disabled. माझी शिदोरी...Marathi: प्रस्तावना

Monday, March 13, 2006

प्रस्तावना

(पुढे चालु)प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. असे भगवंतानी म्हंटलेलेच आहे. माझ्या बाबतीत हे लागु होते पण ५० टक्केच. आणी ही टक्केवारी काही वाढयची शक्यता नाही. माझ्या मागे स्त्री आहे पण अजुन मी यशस्वी झालो नाही. बरे माझ्या मागे जी स्त्री आहे तिच्यामुळे यशस्वी होण्याची शक्यताच नाही. ही माझ्या मागे आहे म्हणजे खरोखरच आहे हो, अगदी हात धुवून वगेरे म्हणतात ना तसे. लिखाणाला प्रोत्साहन दयायचे वगेरे सोडाच पण वरतून दरडावते कि असले रिकामटेकडे उद्योग तुंम्हाला सुचतातच कसे? आणी अशा गोष्टीसाठी नविन वह्या बाजारातुन आणुन काळ्या करत बसायची गरज नाही. ऑफिसातुन रुलींग पेपर आणुन त्यावर खरडत जा. जमले तर जमले नाहीतर दुसऱ्यादिवशी सकाळी आपल्या बंडु साठी उपयोगी पडतील. बर काहीतरी रागावून गप्प बसवावे म्हंटले तर वरुन ऎकावे लागते की पुराण काळा पासुनच स्त्रिंयाची मुस्कटदाबी होत आलेली आहे. पण आता स्त्री जागी झालेली आहे. (नशिब माझे आता तरी हिला जाग आली.)
मला आठवते सासरी पाठवताना हिचा बाप खुपच रडत होता. मी म्हणालो एवढी चिंता नका करु तुम्ही. मी तिला चांगली संभाळीन. त्यावर सासरे धिरगंभीर होत म्हणाले, " मला तिची चिंता नाही वाटत हो. तुम्ही स्वताला संभाळले म्हणजे खुप झाले. पोरगी अगदी आईच्या वळणावर गेली आहे." यावर मी नसलेली छाती फुगवण्याचा प्रयत्न करुन म्हणालो होतो " बघा मी तिला कशी ठिक करतो ते?" आता इतक्या वर्षाने मागे वळुन पहातो तर मी तिला ठिक करायचे सोडाच पण तिने मात्र मलाच ठिक ठाक केले आहे.
जावु द्या, असे रडगाणे कशाला गायचे? प्रतिकुल परिस्थितीवरही जो मात करुन आपली प्रतिभा जोपासतो तोच खरा मनस्वी कलावंत.( वा: वा:) एकदा का माझी चरित्रकथा पुर्ण झाली आनं माझी भटकंती प्रकाशकाच्या शोधात निघाली. सापडलाही एक नव प्रकाशक. संपुर्ण वाचल्या नंतर त्याने निरोप दिला की आमच्या म्हणजे त्यांच्या सौभाग्यकांक्षिणीचे मत घेणे गरजेचे आहे.
मला त्यांचा स्त्री आदर, त्यांना निर्णयात सामावुन घेणे वगेरेचा विचार खुपच कौतुकास्पद वाटला. नंतर मात्र कळाले कि छापखाना टाकण्यासाठी त्यांच्या सासरेबुवांनी भांडवल दिले आहे आनं त्यांच्या पत्नीचे मते ( सगल्याच पत्नींचे मत असेच असते म्हणा!) हे अगदीच बावळट आहेत, कोणीही ह्यांना सहज फसवु शकते. त्यामुळे तिच्या नजरे खालुनच सगळे व्यवहार गेले पाहिजेत. शेवटी त्यांचाही होकार मिळाला. एका प्रतिभावंताची दुसऱ्या प्रतिभावंताला दिलेला प्रतिसाद होता तो! शेवटी हिऱ्याची पारख करण्यासाठी रत्नपारखाचीच नजर असावी लागते हेच खरे! आता त्यांच्या तिच्या LLTT(Looking Londan Talking Tokeyo) इथे काही संबध नाही.
आता प्रस्तावना संपत आली आहे. ( कोणी सोडला हो दिर्घ सुस्कारा?) माझ्या नवलेखकाच्या प्रस्तावनेला रसिक वाचकांचा कसा प्रतिसाद मिळतो ह्यावरच पुढची वाटचाल अवलंबुन आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या आधीचा माझा अनुभव म्हणावा तितकासा चांगला नाही. ह्या आधी मी कविता ही केल्या होत्या. एका नवकवी संमेलनात काव्य वाचनाची संधी ही मिळाली होती. पहिल्या कवितेचे कौतुक झाले म्हणुन दुसरी वाचायला घेतली तेव्हा रसिकांनी घडयाळावर नजर फिरवायला चालु केली. काही महाभागांनी तर घडयाळ हलवुन हलवुन ते चालु आहे का ह्याची खात्री करुन घेतली. काय करंटेपणा म्हणायचा हा? तरी मी त्याकडे दुर्लक्ष करुन आपले काव्य वाचन पुढे चालुच ठेवले होते. माझ्या कवितेतला गर्भार्थ त्यांना आकलन नाही झाला ह्यात माझा काय दोष? नसते एकाद्यापाशी एवढी कुवत! एकदा कमल हसन चा `पुष्पक' नावाचा सिनेमा पहायला गेलो होतो. तो चालु होवुन २०-२५ मिनीटे झाली असतील नसतील, तर एक जोडपे उठुन घरी जायला निघाले. का तर ति बाई तिच्या नवऱ्याला म्हणाली "ह्या सिनेमा मुक बधीर लोकांसाठी दिसतोय, आपण उगीचच आलो." कहर म्हणजे जाता जाता एक कुत्सित कटाक्ष आमच्या सौ. वर टाकुन गेली. ते गेले खरे पण आमच्या हिला तु मुक-बधिर नाहीस हे समजवता समजवता माझा पुढचा अख्खा आठवडा सार्थकी लागला. इथे प्रस्तावना समाप्त होत आहे. बोला "पुंडलीक वरदा हरि विठ्ठल!!!"

2 Comments:

Blogger hemant_surat said...

aflatoon! Please carry on. Awaiting the next episode.

6:01 AM  
Blogger Y3 said...

झकास....
प्रस्तावनेचे तिन्ही भाग एकाच बैठ्कीत परत एकदा (चे) वाचून झाले..:-)
मस्त जमलिये बर का प्रस्तावना, ...[अजून (विशेषणांना) जागतोय..].. लेखक म्हणून तुम्ही निश्चितच झोपणार नाही ह्याची खात्री बाळ्गावीत.

पुढील प्रकरणाच्या प्रतिक्शेत...
शुभेछा. यतीन

12:26 PM  

Post a Comment

<< Home

Online College Degree, Online Master Degree, Life Experience Degree, Online Bachelor Degree
Online Degree>