शेअर मार्केट आणि तदनुषंगिक मानवी व्यवहार यांचा जवळून अभ्यास असलेल्या एका तज्ज्ञांनी सत्यम घोटाळय़ाचं केलेलं मार्मिक विश्लेषण
आतापर्यंत बहुतेक सत्यमचे राजू कुठे तरी अज्ञातवासात असतील किंवा कायद्याच्या स्वाधीन झाले असतील. नुकतीच त्यांनी मनाची टोचणी दूर केलेली आहे. आता त्यांच्या मनाची रुखरुख थांबली असेल. त्यांचे राजकारणी मित्र सत्यमला वाचवण्याची तयारी करत असतील. त्याचे वकील कोर्टात जायची तयारी करत असतील. गेली आठ वर्षे टोचणी, रुखरुख ही टूल्स डिसेबल करून ठेवल्यानंतर काल त्यांना अचानक कन्फेशनचा उमाळा आला आणि त्यांनी शेअर बाजार उघडता उघडता एक चार पानी पत्र आणि राजीनामा त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरसमोर ठेवला.
करू नये तो केला व्यापार
उतरी पार तुका म्हणे.
सप्टेंबरच्या ताळेबंदात फुगवून सांगितलेली शिल्लक.
त्या शिल्लकीवरचं खोटं व्याज.
बाराशे कोटी रुपयांची न सांगितलेली तूट.
दोन हजार कोटींची न येणारी वसुली.
गुंतवणुकीवर चढवून फुगवून लिहिलेला परतावा. परतावा २४ टक्के असल्याचा दावा. पण प्रत्यक्षात ३ ते ४ टक्के.
ही परिस्थिती नवीन नसून गेली कित्येक वर्षे हेच करत असल्याची कबुली.
मेटास कंपनी खरेदी करणे, हा पण एक सत्य लपवण्याचा प्रयत्न.
कुठल्याही डायरेक्टरचा या घोटाळ्याशी संबंध नसल्याची ग्वाही, वगैरे वगैरे.
थोडक्यात काय, तर सुमारे त्रेपन्न हजार लोकांच्या पोटावर पाय. गुंतवणूकदारांचे काही हजार कोटी रुपयांचे नुकसान आणि सगळ्यात मोठे नुकसान देशाचे. कारण इथून पुढे भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांकडे ‘नायजेरीयन फ्रॉड’ म्हणून बघितले जाईल. गमावलेली विश्वासार्हता परत येण्यासाठी कमीत कमी दहाएक र्वष तरी जातीलच, तोपर्यंत सगळे संगणक शास्त्री. तलवारीच्या धारेखाली. त्यांची स्कील सेट्स जुनी होतील. मोठय़ा उत्पन्नाच्या आधारावर घेतलेल्या घराच्या भिंती दिवसाउजेडी खायला उठतील. कदाचित बऱ्याच जणांना अमेरिकेहून किंवा युरोपातून परत मायदेशी यावं लागेल. इथे एक्स-सत्यमचा टोमणा सहन करावा लागेल. त्यातून सावरता सावरता तोपर्यंत संगणक शास्त्रींची नवी फौज दारात उभी असेलच. त्यांच्याबरोबर परत स्पर्धा.
मला गिरणी कामगारांची अवस्था आता आठवते आहे. कंपनीच्या गेटवर सांडासारखी डुरकणारी ती माणसं आठवतात, जी टाळेबंदी झाल्यावर देशोधडीला लागली. अगदी हुबेहूब असेच होईल, असे काही नाही. पण कळा सोसाव्या लागतीलच काही वर्षं तरी.
बघा गंमत काय आहे. या फ्रॉडला उपमासुद्धा दुसऱ्या फ्रॉडचीच द्यावी लागते आहे. नायजेरीयन फ्रॉड. ते नाही म्हटलं तर पोंझी कंपनी म्हणावं लागेल. पोंझी कंपनी नाही म्हटलं तर एन्रॉन म्हणावं लागेल. एन्रॉन नाही तर आर्थर अँडरसन म्हणावं लागेल. काही झालं तरी रामलिंगा राजू यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा घोटाळा केला आहे. (बिचारा हर्षद मेहता, सी. आर. भन्साळी, केतन पारेख सगळे राष्ट्रीय पातळीवरच राहिले.)
आपल्या कबुलीनाम्यात राजूंनी कंपनी फॉच्र्युन ५०० कंपन्यांमध्ये नेल्याचा उल्लेख केला आहे. आपला वैयक्तिक फायदा किंवा कुटुंबातील इतरेजनांचा काही संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्यांना म्हणायचं असावं की, मी जे काही केलं ते कंपनीसाठी. मी अपहार केला तो कंपनीसाठी. मी वैयक्तिक नुकसान केलं ते पण कंपनीसाठी. राजूंनी केलेला हा घोटाळा पाहिल्यावर मला मर्फीच्या पुस्तकातला शोपेनहारचा एंट्रॉपीचा नियम आठवला.
If you put a spoonful of wine in a barrel full of sewage, you get sewage.
If you put a spoonful of sewage in a barrel full of wine, you get sewage.
तरी एक बरं आहे की, सत्यमचा तमाशा बतावणी होता होताच संपुष्टात आला. खरा वर्ग मेटास कंपनी ताब्यात घेण्याचा होता. नशीब असं की, फिडेलिटी फंडानी कोर्टात जाण्याची तयारी केली आणि टेकओव्हरचा वग संपलाच. मौसम जर तेजीचा असता तर सत्यमचा भाव आकाशाला भिडला असता आणि नंतर पाताळात गेला असता. घोटाळ्याची व्याप्ती शंभर पटींनी वाढली असती.
सगळ्यात महत्त्वाचे काय, तर ते म्हणजे इथून पुढे काय? उत्तर सोपं आहे. आतापर्यंत जे इतरांचं झालं तेच. काही दिवस पोलीस कस्टडीनंतर ज्युडीशिअल कस्टडीनंतर जामिनावर सुटला. पुढे खटला बोर्डावर यायला सहा-सात वषर्ं. सुनावणीला चार-पाच वषर्ं. तोपर्यंत राजकीय रसायनं बदलली असतील. पोलीस अधिकारी निवृत्त झालेले असतील. जज्ज वकील झालेले असतील. नवा फ्रॉड शिजत आलेला असेल. तो राजूंच्या फ्रॉडपेक्षा सुपरडय़ुपर असेल. राजू नातवंडे खेळवत आपल्या बहादुरीच्या कथा सांगत असतील. खरं नाही ना वाटतं? पण होणार ते असंच. कदाचित एखादी जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) बसेल. येणाऱ्या निवडणुकीत सत्यमचं भांडवल कामाला येईल. प्राईस वॉटरहाऊसचे काय? ते तर राजूंचे आध्यात्मिक गुरू. त्याचं आर्थर अँडरसनसारखं काहीतरी होईल. नव्या पॅकिंगमध्ये याच कंपन्या परत येतील. आम्ही परत त्या कंपन्यांना मखरात बसवू आणि पुन्हा एकदा भरवशाचा गुरव गाभाऱ्यात याची तक्रार घेऊन येऊ.
हर्षद मेहताच्या प्रकरणाचं काय झालं?
त्याचे अॅॅसेट एकत्र करून विकण्याचा कार्यक्रम आजही चालूच आहे. ब्याण्णव सालचा घोटाळा आणि त्यातील जप्त शेअर्सची विक्री व्हायला २००० साल उजाडलं. माधुलीमधले फ्लॅट विकायची नोटीस आता २००९ साली निघतेय.
सी. आर. भन्साळीचं काय झालं? जेमतेम वर्षभर तुरुंगात काढल्यावर जामिनावर सुटला.
एसेम शूजचं काय झालं?
चर्मकार घोटाळ्याचं काय झालं?
चारा घोटाळ्याचं काय झालं?
अन्नाच्या मोबदल्यात तेल घोटाळ्याचं काय झालं?
तेच होणार सत्यमच्या घोटाळ्याचं.
असं असतं तरी काय?
या अशा घोटाळ्याचा निपटारा करताना प्रचंड कालापव्यय का होतो? परत राजू प्रकरणाचे उदाहरण बघू या. राजूंचे पत्र जर नीट वाचले तर लक्षात येईल, की राजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आकडय़ांचा खेळ रचून दिशाभूल केली आहे. हातात नसलेले पैसे खिशात असल्याचा दावा केला आहे. परंतु आर्थिक अपहार सिद्ध व्हायला वेळ लागेल. पैशाचे अपहरण झाले आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आठ वर्षांचे हिशोब तपासायला लागतील. तपासणी अधिकारी चार्टर्ड अकाऊंटंट नाहीत. त्यांना बाहेरून मदत मागवावी लागेल. कायद्याची नक्की कुठली कलमं लावायची हे कायदेपंडितांना ठरवावे लागेल.
आर्थिक घोटाळ्याचे बदलते स्वरूप बघता काही गुन्ह्यासाठी योग्य ती कलमं हातात नसतील तर लोकसभेकडे जावे लागेल. जर योग्य ती कलमं वापरली गेली नाहीत तर केस कमकुवत होईल.
माणसं फ्रॉड का करतात?
काही नाईलाजास्तव करत असतील तर काही सवय म्हणून करत असतील. काही जणांचा हा पूर्णवेळ व्यवसाय पण असेल. काही जण कायद्याच्या किंवा कायदा हाकणाऱ्यांच्या कमकुवतपणाचा फायदा करून घ्यावा म्हणून करत असतील. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की घोटाळे करणं, चोरी करणं, लाचखोरी करणं, हातचलाखी करणं, विश्वासघात करणं ही सगळी कमकुवत मानवी मनाची लक्षणं आहेत. बऱ्याच वेळा फ्रॉड करणाऱ्याला समोर कडेलोट दिसत असतो. पण प्रवास थांबवणं हातात राहिलेलं नसतं. माझा एक मित्र अशा कमकुवतपणामधून जन्माला आलेल्या व्यवहाराला ट्रेडमिल वॉकिंग म्हणतो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फ्रॉड थांबवायची एकच संधी असते. ती म्हणजे फ्रॉड सुरू न करणे. तो म्हणायचा रामदास फ्रॉइस्टर या पट्टय़ावर हौशीनं चढतो. मग पट्टा हळूहळू फिरायला लागलो. तो चालायला सुरुवात करतो. वेग वाढतो. पाय पण चटचट धावायला लागतात. मशीन आणखी वेग वाढवतं तो पळायला सुरुवात करतो. नंतर काही वेळानी पट्टय़ाच्या वेगाने धावणं हे एकच ध्येय शिल्लक राहतं. पाय थकतात. तरी धावत राहतात. एकदा तरी निश्चयाने या पट्टय़ावरून उडी मारून दूर व्हावं. पण नाही. त्याचा हट्ट त्याला तसं करूच देत नाही. पट्टा थांबवणं त्यांच्या हातात नाही. उडी तरी मारावी. थकून तो कोलमडतो..
तोपर्यंत दुसरा माणूस त्या पट्टय़ावर धावायला सुरुवात करतो.
खोटं काम आहे ते असं या धावत्या पट्टय़ावर हुकमत कुणीच करू शकत नाही. जे हट्ट करतात ते कोलमडतात. तरी माणसं धावत राहतात. थकत राहतात. संपतात. पट्टा अखंड फिरत राहतो.
कल्पवृक्षचे डॉ. उमेश खाडे एकदा मला म्हणाले होते, चांगल्या कामाची सुरुवात करताना सगळेच देवदूत असतात. वाटेत कुठेतरी चकवा भेटतो आणि देवदूताचा सैतान होतो.
फसणारे का फसतात?
फसलेले फसवणाऱ्यांना कसे विसरून जातात?
आणि सगळ्यात महत्त्वाचे एकदा फसल्यावर परत परत का फसत राहतात?
या प्रश्नांची उत्तरं देणं फार कठीण नसलं तरी फार लांबलचक होईल. पण थोडक्यात सांगायचं झालं तर असं सांगता येईल. आपली फसण्याची मानसिकता वारंवार बदलत असते. प्रत्येकाचे फसण्याचे प्रांत वेगळे असतात. विचार फक्त आर्थिक फसवणुकीचा केला तर लोक फसतात, कारण दरवर्षी फसणाऱ्यांची नवी पिढी जन्माला येत असते. आंतरजालावर माहिती सहज मिळत असल्यामुळे फक्त स्वत:वरच विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढत जाते आहे. विसरभोळा आशावाद नवीन गुंतवणूकदार बाजारात आणत राहणार. सगळ्यात महत्त्वाचं असं की पैसे गुंतवण्यापूर्वी सल्लागाराकडं जाऊन त्याला पैसे देऊन सल्ला विकत घेण्याची तोशीस कुणीच घेत नाही. केवळ ऐकिवात माहितीवर भरवसा टाकून पैसा गुंतवला जातो.
गुंतवणुकीला ज्या गांभीर्याची अपेक्षा असते त्या गांभीर्याने विचार होत नाही. इंग्रजीतला एक वाक्प्रचार मला फार आवडतो तो असा की
A fool and his money soon part the company.
आता काही जण म्हणतील की आंध्रवाले सगळेच असे असतात. हर्षद मेहताच्या वेळी सगळे गुजराती असेच असतात असं म्हणत होते.
एक गोष्ट नक्की आहे की फ्रॉडला भौगोलिक सीमा नाहीत. जात नाही. भाषेचं बंधन नाही. लिंगभेद नाही. फ्रॉड देश कालपरत्वे बदलत नाही.
ज्या दिवशी विनिमय आला त्या दिवशी फ्रॉड जन्माला आला. मला देश दाखवा, मी फ्रॉड दाखवतो. मला काळ सांगा, मी फ्रॉड दाखवतो. मला माणूस दाखवा, मी फ्रॉड दाखवतो.
आणि फसला असाल तर फारसे वाईट वाटण्याची गरज नाही. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे सर आयझ्ॉक न्यूटन यांचे पैसे पण एका फ्रॉडमध्ये असेच वाया गेले होते.
पेशवाईच्या काळातली गोमा गणेश पितळी दरवाजाची गोष्ट आठवते का?
कचेरीतल्या एका कारकुनाच्या लाचखोरीला कंटाळून चिटणीस त्याची प्रत्येक वेळा बदली करायचे.
बदलीच्या प्रत्येक ठिकाणी हा कारकून लाच घेण्याची नवी शक्कल शोधून काढायचा.
शेवटी पेशव्यांपर्यंत तक्रार गेली. पेशव्यांनी या कारकुनाची बदली पुणे शहराबाहेर एका दरवाजाजवळ केली. बरेच दिवस कारकुनाची तक्रार आली नाही. पण त्या बाजूने येणाऱ्या कागदांवरती एक नवी मोहर दिसायला लागली.
गोमा गणेश पितळी दरवाजा.
चौकशी केल्यावर समजलं की दरवाजा बाहेर ठेवलेल्या कारकुनाने ही नवी मोहर कागदावर लावायला सुरुवात केली आहे.
कारकुनाला पाचारण करण्यात आले. खुलासा मागण्यात आला. त्याने सांगितलं की, तो शहराबाहेर असल्यामुळे तो कामावर आहे किंवा नाही हे कचेरीत कळावं म्हणून हा खटाटोप.
खरं कारण असं होतं की, लाच खायला सवकलेल्या कारकुनाला काही वरकड उत्पन्न होईना. त्याने नवी शक्कल लढवली. येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येक गाडीवानाकडून हा इसम कागद मागायचा आणि त्यावर गोमा गणेश पितळी दरवाजाच शिक्का मारून पुढे जाण्याचा इशारा करायचा. गाडीवानाकडे मागणी केली नाही तरी चिरीमिरीची प्राप्ती व्हायचीच.
नाणी बदलतील, चलन बदलेल, राज्य बदलेल, सत्ता बदलेत, पण पृथ्वीवर कुठेही जा फ्रॉड आहेच.
ज्यांना ही गोमा गणेश पितळी दरवाजाची गोष्ट कपोकल्पित वाटत असेल त्यांच्यासाठी एक आणखी सुरस आणि चमत्कारिक कथा सांगतो.
बॅकबे कंपनीची. हा कालखंड साधारण १८६२ ते १८६६ चा होता. मुंबईत औद्योगिक वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती. आपल्या या कथेचा नायक आहे प्रेमचंद रायचंद. मुंबईतल्या एका सावकारी (तेव्हा त्याला श्रॉफी असंही म्हणायचे) घराण्यात याचा जन्म झाला होता. अतिशय हुशार, धूर्त आणि दानशूर अशा या माणसाला मुंबईचा सगळ्यात मोठा सटोडिया हा किताब मिळाला त्याच्या कॉटन मार्केटच्या आणि शेअर बाजारातील यशस्वी सट्टय़ामुळे. त्या वेळी अमेरिकन यादवी युद्ध जोरात चालले होते. कापसाच्या बाजारात त्यामुळे प्रचंड तेजी होती. मुंबईत कापसाच्या सट्टय़ात लोकांनी लाखो रुपये कमवायला सुरुवात केली होती. त्या एका वर्षांमध्ये एकूण सत्तेचाळीस कंपन्यांची नोंदणी झाली. बँका त्या वेळी शेअरमध्ये पैसे गुंतवण्यास कर्ज द्यायच्या नाहीत. प्रेमचंद रायचंदनी आपल्या वडिलांकडून पैसे घेऊन या बँकेला कर्ज दिले आणि हळूहळू बँक ताब्यात घेतली. यानंतर बँकांनी शेअर्समध्ये सट्टा करण्यासाठी कर्ज द्यायला सुरुवात केली. सोबत स्वत:साठी प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले. या माणसाची खासियत अशी की त्यांने घेतलेले शेअर्स त्याच्या नावावर कधीच नसायचे. मुनीम, मेहेता, कारकून यांच्या नावावर सगळी गुंतवणूक.
यापाठापोठ मुंबईत नव्या
कंपनींचे पेव फुटले. पेपरमधली जाहिरात पूर्ण न वाचताच शेकडो अर्ज कंपन्यांकडे पैशासकट येऊन पडायचे. शेअर्सची अलॉटमेंट होण्याआधीच त्यात सौदे लिहायला सुरुवात व्हायची. त्यावरचे प्रीमियम जाहीर व्हायला लागले. सगळ्या कंपन्यांना एकच दलाल हवा असायचा. प्रेमचंद रायचंद बऱ्याच वेळा कंपन्या सटोडियाला पैशाऐवजी आणखी शेअर्स द्यायच्या. सटोडियाचं आणखी फावायचं. अशीच एक नवी कंपनी आली. बॉम्बे लँड रेक्लेमेशन कंपनी. या कंपनीला बॅकबे कंपनी म्हणून पण ओळखलं जायचं. आता जिथे नरिमन पॉइण्ट आहे, ती सगळी जमीन भराव टाकून ताब्यात घेण्याचं काम ही कंपनी करणार होती. त्याच वेळी भायखळा माझगाव परिसरात आणखी एक कंपनी आली. माझगावच्या बाजूला असलेला समुद्र हटवून जमीन तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवून ही कंपनी तयार झाली होती. प्रेमचंद रायचंद यांच्या हुशारीचा एक किस्सा सांगितल्याशिवाय ही कथा पुढे सांगणं कठीण आहे. माझगावच्या डेव्हलपिंग राइट्सची किंमत साधारण पाच लाख गृहीत धरली गेली होती. प्रेमचंद रायचंदनी हे राइट्स चाळीस लाख रुपये देऊन सकाळी विकत घेतले आणि संध्याकाळी साठ लाखाला विकून टाकले. सहा तासात वीस लाख रुपये (१८६४ साली).
तारतम्याचा अंत झाला की तेजी संपुष्टात येते
हळूहळू मुंबईला तेजीच्या ज्वरांनी पछाडलं. जे शेठ करेल तेच मुनीम करायला लागला. मुनीम करेल तेच मेहेता करेल. मेहेता करेल ते कारकून. कारकून करेल ते ड्रायव्हर आणि माळी. मुंबई शेअर बाजार तापून लाल झाला. आधी बॅकबे कंपनीचे चारशे शेअर्स सरकार घेणार होतं, पण तो इरादा ऐनवेळी बदलल्यावर त्या चारशे शेअर्सचा लिलाव करण्यात आला आणि मग दोन लाख रुपयांचे शेअर्स दहा कोटी पाच लाखाच्या बोलीस विकले गेले.
आणि एक दिवस अमेरिकेतलं युद्ध संपलं. कापसाच्या व्यापाराला मंदीचं ग्रहण लागलं. सटोडिये पैसे चुकवायला टाळाटाळ करायला लागले. दिवाळखोरीची लाट आली. शेअर बाजार तीन दिवस बंद ठेवला गेला. पण पैशाची तरतूद होईना. एकामागोमाग कंपन्या बंद पडायला लागल्या. बॅकबे कंपनीसकट सगळ्या कंपन्यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली. एकेक करून सगळे ब्रोकर दिवाळखोर झाले. आपले कथानायक प्रेमचंद रायचंद यांची सगळी मालमत्ता विकल्यावर एकूण देण्याच्या फक्त दीड टक्के रक्कम वसूल झाली.
वाचकांना एक विनंती. १९९२ साली हर्षद मेहता बाजारात आला. प्रेमचंद रायचंद यांच्या वर लिहिलेल्या कथेत फक्त हर्षद मेहता हे नाव टाका. कथा तशीच्या तशीच आहे. केतन पारेखचं नाव टाकून बघा. कथा तशीच आहे. तशीच तेजी तसंच वारं डोक्यात जाणं तसाच अंत.
फरक एवढाच की हर्षद मेहता आणि केतन पारेख यांनी फ्रॉड करताना एक पायरी पुढे जाऊन खोटी कागदपत्र वापरली. या सटोडियांमध्ये साम्य असं की यांना आपण सोशल इंजिनिअर झाल्याचा साक्षात्कार झाला होता. मुंबईचा राजाबाई टॉवर जो प्रेमचंद रायचंद यांनी बांधला तो आजही याची साक्ष देतो आहे.
पावसाळा संपता संपता माळ्यावर छत्री टाकली की पुढच्या पावसाळ्याचा पहिला वादळी पाऊस आल्याशिवाय छत्रीची आठवण होत नाही. अधेमध्ये बेमौसमी वादळ आणि गारपिट झाली तर? असा मनात विचार पण मनात येत नाही. तुमच्या- माझ्यासारखे छोटे छोटे गुंतवणूकदार असेच घडीची स्मरणशक्ती असलेले असतात. राजूचा पुढचा अवतार बाजारात अवतीर्ण होईस्तो आपल्याला परत या घटनेची आठवण पण होणार नाही.
याआधीचे सगळे घोटाळे झाले तेव्हा आपण ग्लोबल नव्हतो. आपल्या अर्थव्यवस्थेच्या समस्या आपल्या खाजगी होत्या. आता ग्लोबल झाल्यावर जागतिक समस्या पण आपल्याच समस्या आहेत किंवा आपल्या समस्या जागतिक आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे प्रॉब्लेम आपले आहेत. पाकिस्तानमधला बर्ड फ्ल्यू पण आपलाच आहे. आपला राजू त्यांचा आहे त्यांचा बर्नाड आपला आहे, एक सुंदर वाक्प्रचार आता मला आठवला.
In Global Economy,
A Bear sneezes at North pole
And a man dies in Peking.
या लेखाचा समारोप करताना येऊ घातलेल्या समस्यांचा विचार जर आपल्यासमोर मांडला नाही तर लेखनाचा मूळ हेतू गहाळ होईल असे वाटते.
सत्यमच्या निमित्ताने एक गोष्ट निश्चित आहे की, घोर मंदीच्या कालखंडात आपण प्रवेश केला आहे. अमेरिकेहून आपण फार दूर आहोत असा विचार करणे म्हणजे कोंबडं झाकून ठेवण्यासारखं आहे.
मुर्गे की अम्मा कब तक खैर मनाएगी?
सत्यमनंतर आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या बऱ्याच संगणक कंपन्या कोलमडतील. सुशिक्षित बेकारांची संख्या वाढेल.
ज्या ज्या क्षेत्रात गेली सहा-सात वर्षे तेजी होती त्या त्या क्षेत्रातले नवनवीन घोटाळे उघडकीस येतील. कदाचित रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचा नंबर लागेल.
एक महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंत पार्टिसिपंटरी नोट्स हा प्रकार फार हलकेच घेतला गेला आहे. वाढत्या अतिरेकी हल्ल्यामुळे असंही वाटतं की, बाजारात काही संशयास्पद एजन्सीजचा पैसा पण असेल. मध्यंतरी लोकसभेत काही तुरळक केसेसचा उल्लेख झाला होता, पण माननीय अर्थमंत्र्यांनी त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला होता.
चांगल्या कंपन्यांची आवक कमी होईल. जागतिक अविश्वासाच्या वातावरणात काही वर्षे काढायला लागतील.
औद्योगिक उत्पन्नाचा दर कमी झाल्यामुळे बाजारात मंदी असेल. व्याजाचे दर वाढतील. महागाई पण वाढेल. गेल्या काही वर्षांत भारतीय रिझव्र्ह बँक आपली आर्थिक व्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था यामधील धोरणात्मक समतोल सांभाळण्यात यशस्वी झाली आहे, परंतु घोटाळ्याचे सावट कायम डोक्यावर राहील.
या घोटाळ्यानंतर काही महत्त्वाच्या बाबींकडे गांभीर्यानी बघण्याची आवश्यकता आहे.
१. विमा क्षेत्राच्या खाजगीकरणानंतर आलेल्या नव्या कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन विकले आहेत. त्या प्लॅनचे मॉनिटरिंग आवश्यक आहे.
२. प्रॉव्हिडंट फंड काही खाजगी कंपन्यांकडे हाताळणीस देण्याचा सरकार विचार करत आहे अशी बातमी मध्यंतरी वारंवार वर्तमानपत्रात येत होती. तसे असेल तर आता त्याचा पुनर्विचार होणेही आवश्यक आहे.
सौजन्य : लोकप्रभा